कोरेगाव भीमा : कोरोगाव भीमा ते वढू बुद्रुक रस्त्यावर एका ४६ वर्षीय व्यक्तीचे धडापासून शीर वेगळे करून खून केल्याची घटना शनिवारी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुशांत अनिल करमरकर (वय – ४६, रा. मूळ लाल बाजार कामगार पागा, जिल्हा ब्याकुडा, पश्चिम बंगाल, सध्या इनामदार बिल्डिंग, कोरेगाव भिमा, ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक या रस्त्यावर असलेल्या इनामदार बिल्डिंगमधील १ नंबरच्या रूममध्ये मयत सुशांत राहत होता. सदर ठिकाणी शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास त्याच्यावर अज्ञात इसमाने धारधार शास्त्राने वार करून धडापासून त्याचे शीर वेगळे केले. यावेळी ग्रामस्थांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस ताताडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेहाला पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवले. आसपास असणाऱ्या दुकानांचे सीसीटीव्हीद्वारे पडताळणी करून माहिती घेण्यात येत आहे.
दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलीस आयुक्त यशवंत गवारे, पुणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिळीमकर, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, यांनी पाहणी केली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतकरे, सहाय्यक पोलीस फौजदार अविनाश थोरात, पोलीस हवालदार जितेंद्र पानसरे, दांडगे, होनमाने, शिवणकर, विकास पाटील, नागरगोजे, यांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्तीविरोधी गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.