यवत : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भांडगाव गावच्या हद्दीतील भांडगाव फाटा येथे मंगळवारी पहाटे अपघात झाला. एका ट्रेलरने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारा आयशर टेम्पो ट्रेलरला जोरदार धडकला. या अपघातात आयशर चालकाचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, भांडगाव गावच्या हद्दीतील भांडगाव फाटा येथे मंगळवारी (दि.२२) पहाटे साडेतीनच्या सुमारास मोहम्मद रज्जाब शेख (रा. सेक्टर नं.२३ ट्रान्सपोर्टनगर निगडी, ता.हवेली जि.पुणे) याने ट्रेलर (एमएच ४६ एएफ ८२७६) धोकादायक स्थितीत सोलापूर-पुणे महामार्गावर उभा केला.
त्यामुळे सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या आयशरची (एमएच ४२ एक्यू ८८१०) ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक बसली. यामध्ये चालक अक्षय मुकेश पिल्ले यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मोहम्मद रज्जाब शेख याच्याविरूद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भांडगाव येथे पुणे-सोलापूर महामार्गावर असणाऱ्या मुख्य महामार्गावरच चुकीचा गतिरोधक बनवला असल्याने या ठिकाणी आतापर्यंत अनेक अपघात होऊन अनेकजण जखमी झाले आहेत. तर काही जणांना जीव गमवावा लागला आहे. गतिरोधक येण्याअगोदर रस्त्याला उतार आहे. त्यामुळे वाहने गतिमान होऊन गतिरोधक जवळ येतात आणि अचानक गतिरोधक दिसला की ब्रेक लावला जातो अशावेळी मागून येणारे वाहन पुढील थांबलेल्या वाहनाला धडकतात.
दरम्यान, नेहमीच या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना हा गतिरोधक माहीत असल्याने ते वाहनाचा वेग कमी करतात. परंतु, नवीन येणाऱ्या चालकांना या गतिरोधकबाबत माहिती नसल्याने अपघात घडत आहेत.