पुणे : अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना भक्तनिवासामध्ये बुकिंगच्या नावे गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. गेल्या महिन्यात अशा अनेक घटना घडल्या असून त्यामध्ये नवी मुंबईसह, मुंबई, पुणे येथील भक्तांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
इंटरनेटवर भक्तनिवासाची माहिती शोधून ऑनलाइन बुकिंग करणारे भक्तांची या सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्यात येत आहे. घणसोली येथे राहणाऱ्या किरण पाटील यांच्यासोबत हा प्रकार घडल्यानंतर संपूर्ण राज्यात अशी ठकबाजी सुरू असल्याचे समोर आले.
मिळालेल्या माहिती नुसार, रविवारी किरण पाटील हे अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणार होते. यासाठी शनिवारी रात्री ते भक्तनिवासामध्ये राहण्याची सोय आहे का हे तपासात होते. यावेळी ऑनलाइन मिळालेल्या मोबाइल नंबरवर संपर्क साधून त्यांनी फोनवरील व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे ११०० रुपये भरले होते.
मात्र, रविवारी ते भक्तनिवासात पोहचले असता, त्यांच्या नावे बुकिंग नसल्याचे त्यांना समजले. बुकिंग केलेल्या नंबरची माहिती दिली असता, तो नंबर व्यवस्थापनाचा नव्हता अशी माहिती त्यांना समजली. यामुळे आपली फसणूक झाल्याचे त्यांना समजले .
दरम्यान, यासंदर्भात व्यवस्थापनाने अक्कलकोट पोलिसांकडे व सायबर पोलिसांकडेदेखील तक्रार केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत गुन्हेगार मोकाट असल्याने व इंटरनेटवर भक्तनिवासाच्या नावे फसवी माहिती पसरवली जात असल्याने भक्तांची फसवणूक सुरूच असल्याचे चित्र आहे.
गुन्हेगारांकडून भक्तांची उघड फसवणूक होत असतानाही व्यवस्थापन केवळ पोलिसांकडे तक्रार करून हात वर करत असल्याचाही संताप त्यांनी करण्यात येत आहे. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मुंबईसह नवी मुंबई, पुणे येथून मोठ्या संख्येने भक्त जात असतात. त्यापैकी अनेकजण भक्त निवासामध्ये राहण्यासाठी ऑनलाइन बुकिंगला प्राधान्य देतात. अशा अनेक भक्तांची फसवणूक होत आहे .