पुणे: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. ही पालखी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान यावर्षी घुंडरे घराण्याला मिळाला आहे. या वर्षी घुंडरे कुटुंबातील विवेक ज्ञानेश्वर घुंडरे, जनार्दन घुंडरे, अर्जुनराव मारुती घुंडरे आणि सचिन बाळासाहेब घुंडरे हे पालखी रथ ओढणाऱ्या बैलजोडीचे मानकरी ठरले आहेत.

दरम्यान, आज (२ जून) माऊलीच्या मुख्य संजीवन समाधी मंदिरात मान मिळालेल्या बैलजोडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आळंदी नगरीतून ढोल ताशांच्या वादनात या बैलजोडीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संपूर्ण आळंदी परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

‘या’ घराण्याला मिळाला मान…
माऊलींच्या पालखीसाठी विवेक घुंडरे यांनी सातारा जिल्ह्यातील बावधन या गावातून राजा-प्रधान नावाची बैलजोडी बाळासाहेब कदम यांच्याकडून ६ लाख रुपयांना खरेदी केली आहे. याबरोबरच दुसरी बैलजोडी सावकार व संग्राम ही हिंजवडी येथील उमेश साखरे यांच्याकडून ५ लाख रुपयांना खरेदी केली आहे.

तसेच, अर्जुनराव मारुती घुंडरे व सचिन बाळासाहेब घुंडरे यांनी पुण्यातील नांदेड सिटी येथून 5 लाख 51 हजार रुपयांना मल्हार व आमदार ही बैलजोडी बैलाचे मालक निखिल कोरडे यांच्याकडून खरेदी केली आहे. तसेच दुसरी बैलजोडी माऊली व शंभू ही उत्तमनगर येथून मुरलीधर नाणेकर यांच्याकडून 2 लाख 51 हजार रुपयांना खरेदी केली.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी या बैल जोड्यांकडून शेतीची मशागत, बैलगाडी ओढण्याचा सराव करून घेतला जात आहे. या बैल जोड्यांसाठी खुराकात शाळूची वैरण, हिरवा चारा, पेंड, खारीक-खोबर्याचा भुगा, बैलखाद्य आदी मिश्रित स्वरूपात देण्यात येत आहे.
पालखी सोहळा केंव्हा प्रस्थान करणार…
यावर्षी संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा गुरुवार (दि. 19 जून) रोजी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीने जाहीर केलेल्या यंदाच्या पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार पालखी सोहळा सुमारे 256 किलोमीटरचा पायी प्रवास करत आषाढ शुद्ध दशमी, शनिवार (5 जुलै) रोजी पंढरपूरात दाखल होणार आहे. त्यानंतर रविवारी (6 जुलै) ला आषाढी एकादशीचा महाउत्सव पंढरपूरात रंगणार आहे.







