मुंबई : मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी 15 सप्टेंबरपासून ‘मुंबई चलो’ ची घोषणा केली असून, 19 सप्टेंबर रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानात तीव्र आंदोलन करण्याची तयारी सुरू केली होती. परंतु, मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे, ज्यामुळे जरांगे पाटलांच्या या योजनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे यांच्या प्रतिनिधींनी शनिवारी दुपारी मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावे आझाद मैदान पोलीस ठाण्यात आंदोलनाच्या मंजुरीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये या कारणास्तव प्रशासनाने हा अर्ज फेटाळून लावला. यापूर्वी मुंबईत झालेल्या मराठा आंदोलनामुळे संपूर्ण राजधानीची वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.

आगामी गणेशोत्सव व इतर सण-उत्सवांची पार्श्वभूमी आणि सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने हा खबरदारीचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. आझाद मैदानावरील उपोषणाला परवानगी न मिळाल्यामुळे आता मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक कोणती नवीन रणनीती आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







