दौंड : आईचा दोन ते अडीच महिन्यांपूर्वी विनयभंग केल्याचा राग मनात धरून दोघांनी संगनमताने एका 31 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली. सोनवडी (ता. दौंड) हद्दीतील कॉर्डलाईन ते पवार पॅलेस रोडवर मंगळवारी (ता. 17) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अरुण अनिल पवार (वय-31, रा. सोनवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दिनेश विजय पवार (वय-20) आणि रुपेश मिथुन राठोड (दोघेही रा. सोनवडी, ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेप्रकरणी मृताचा भाऊ सुनील पवार (वय -33, रा. सोनवडी) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सोनवडी गावच्या हद्दीतील कॉर्डलाईन ते पवार पॅलेस रोडवर ही घटना घडली. आरोपी दिनेश पवार याच्या मनात अरुण पवार याने दोन ते अडीच महिन्यांपूर्वी त्याच्या आईचा विनयभंग केल्याचा राग होता. याच कारणावरून दिनेशने साथीदार रुपेश राठोड याच्यासोबत संगनमत केले.

त्यानंतर दोघांनी अरुण पवार याला कॉर्डलाईन ते पवार पॅलेस रोडवर एकटे गाठले. त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने गंभीर वार केले. या हल्ल्यात अरुण गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, दिनेश पवार आणि रुपेश राठोड यांच्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए. एम. बिद्री करीत आहेत.







