कोल्हापूर: पुण्याहून कोल्हापूरला परतत असताना 30 वर्षीय विवाहितेचा हातकणंगले परिसरात रेल्वे रुळावर मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तृप्ती सुजित गवळी असे मृत महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे, आंतरजातीय विवाहामुळे माहेरच्या मंडळींशी तिचे संबंध खराब झाले होते. तिच्या मृत्यूनंतर पोलिसांनी नातेवाइकांशी संपर्क साधला; मात्र मृतदेह ताब्यात घेण्यासाठी येण्यास त्यांनी नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.

तृप्ती या करवीर तालुक्यातील कणेरी येथे पतीसोबत राहत होत्या. काही दिवसांपूर्वी त्या पुण्यात आत्याकडे गेल्या होत्या. शनिवारी रात्री त्यांनी कोल्हापूरला परत येत असल्याची माहिती पती सुजित यांना दिली होती. त्यामुळे ते रविवारी पहाटेपर्यंत रेल्वे स्थानकावर त्यांची वाट पाहत होते. मात्र, तृप्ती यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांची चिंता वाढली.
दरम्यान, रविवारी पहाटे हातकणंगले हद्दीतील नर्मदे मळ्याजवळ रेल्वे रुळांवर एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती रुग्णवाहिका सेवेशी संबंधित स्वप्नील नरुटे यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पोलिसांना कळवले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलच्या आधारे मृत महिलेची ओळख पटली.

तृप्ती आणि सुजित यांनी 2020 मध्ये आंतरजातीय विवाह केला होता. या विवाहाला माहेरच्या कुटुंबीयांचा विरोध असल्याने तृप्ती त्यांच्यापासून दूर राहत होत्या. मृत्यूनंतर पोलिसांनी त्यांच्या भावाशी आणि अंबरनाथ पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, नातेवाइकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेमागे अपघात, आत्महत्या की अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी एक चिठ्ठीही मिळाली असून तिची तपासणी सुरू आहे. पतीचा जबाब नोंदवण्यात आला असून पुढील तपास हातकणंगले पोलीस करत आहेत.






