दौंड : दौंड शहर आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध कल्याण मटका जुगाराविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. सोमवारी (ता. 16) एकाच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून आठ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत एकूण 12 हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये रोख रक्कम, पेन, मटका आकडे लिहिलेल्या स्लिपबुक आणि एका मोबाईलचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली कारवाई दुपारी साडेबा वाजता दौंड येथील गोवागल्ली परिसरात अशोक गायकवाड यांच्या लाकडी वखारीच्या आडोशाला करण्यात आली. येथे आशिष प्रकाश गुप्ते (वय 36) हा बेकायदा कल्याण मटका जुगार खेळताना व खेळवताना आढळून आला. दिवसभरातील जमा झालेली रक्कम आणि स्लिपबुक राजू शामवेल गायकवाड याच्याकडे देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या कारवाईत 1 हजार 630 रुपये रोख, एक पेन आणि स्लिपबुक असा 1 हजार 635 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आशिष गुप्ते आणि राजू गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुपारी सव्वा एक वाजता प्रकाश कापड दुकानाजवळ एका भिंतीच्या आडोशाला करण्यात आली. येथे शट्टाप्पा नारायण मिशी (वय-75), शामराव नरसाप्पा जाधव (वय-68), अशपाक रुस्तम सय्यद (वय-56) आणि दिनेश धनवे हे कल्याण मटका जुगार खेळताना व खेळवताना आढळल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या ठिकाणाहून 3 हजार 815 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुपारी तीन वाजता वाळके गॅरेजच्या पाठीमागे एका भिंतीच्या आडोशाला करण्यात आली. येथे रमेश शामराव जाधव (वय 56) आणि शब्बीर हुसेन शेख (वय 65) हे बेकायदा कल्याण मटका जुगार खेळताना व खेळवताना मिळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सायंकाळी चार वाजता देऊळगावराजे येथील विकास सोसायटी कार्यालयासमोरील एका घराच्या आडोशाला करण्यात आली. येथे विष्णू विठ्ठल केदारी (वय 45) आणि बबलू किसन सूर्यवंशी हे कल्याण मटका जुगार खेळवताना आढळून आल्याचा पोलिसांचा दावा आहे. या ठिकाणाहून मोबाईलसह 6 हजार 105 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, या चारही कारवायांमध्ये एकूण 12 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व प्रकरणांत महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास दौंड पोलीस करीत आहेत.






