पुणे: पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 168 किलोमीटरच्या ‘पुणे रिंगरोड’ प्रकल्पाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. या प्रकल्पासाठी अजित पवार यांनी घेतलेला सातत्यपूर्ण पुढाकार लक्षात घेता, त्यांच्या नावाचा विचार व्हावा, असे म्हणत रोहित पवार यांनी राज्य सरकारसमोर मोठा पेच निर्माण केला आहे.

शहरातील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उपाय काढण्यासाठी 1997 मध्ये प्रादेशिक विकास आराखड्यात या वर्तुळाकार रस्त्याची संकल्पना मांडली गेली होती. तब्बल 30 वर्षांचा कालावधी उलटूनही हा प्रकल्प केवळ कागदावरच होता. मात्र, अजित पवार यांनी या कामासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार पाठपुरावा केला. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळेच या मार्गाला अंतिम मंजुरी मिळाली. इतकेच नाही, तर प्रकल्पाचे काम वेळेत आणि वेगाने पूर्ण व्हावे यासाठी ते नियमितपणे आढावा बैठका घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देत असत.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची एकूण 12 टप्प्यांत विभागणी करण्यात आली असून, त्यापैकी 9 टप्प्यांचे प्रत्यक्ष काम सध्या वेगाने सुरू आहे. लवकरच हा मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. पुणे शहर आणि परिसरातील अवजड वाहने शहराबाहेरूनच वळवली जावीत, हा या रिंगरोडचा मुख्य उद्देश आहे.

हा प्रकल्प आता पूर्णत्वास जात असतानाच त्याच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्य सरकारने या मागणीची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जर सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, तर अजित पवार यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात पुणे रिंगरोडच्या नामकरणावरून राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






