पुणे : राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि विविध विधानांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. नुकत्याच पार पडलेल्या एका कीर्तनाच्या कार्यक्रमात त्यांनी प्रेम, पैसा, मोबाईलचा वापर, सरकारी मदत आणि शिक्षण व्यवस्था अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यातील मुलींच्या प्रेमाबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या सर्वत्र नवीन वाद निर्माण झाला आहे.

कीर्तनात बोलताना इंदुरीकर महाराजांनी तरुणांना उद्देशून प्रेमाची एक वेगळीच व्याख्या मांडली. त्यांच्या मते, आजच्या काळात प्रेम म्हणजेच पैसा आणि पैसा हेच जीवन आहे. मुली या कधीच मुलांवर प्रेम करत नाहीत, तर त्यांचे प्रेम केवळ पैशांवर असते, असे खळबळजनक मत त्यांनी व्यक्त केले. एवढेच नाही तर, एखादी मुलगी आपल्यावर प्रेम करते असे म्हणणाऱ्या तरुणांवर टीका करताना, त्या मुलीच्या मेंदूच्या 3 शिरा बंद झाल्या असतील, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. उपस्थित तरुणांपैकी एकाकडे बोट दाखवत, त्याला तर गेल्याच महिन्यात एका मुलीने फसवले आहे, असा दावा करत त्यांनी आपल्या विधानाचे समर्थन केले. या वक्तव्यामुळे समाजमाध्यमांवर आणि विविध स्तरांतून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
याच कीर्तनात महाराजांनी केवळ वादग्रस्त विधानेच केली नाहीत, तर काही महत्त्वाच्या सामाजिक विषयांवरही प्रकाश टाकला. जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या शाळा टिकल्या पाहिजेत, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. जर या सरकारी शाळा बंद पडल्या, तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण घेणे कठीण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

त्याचबरोबर, शासनाने दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले. राज्य सरकारचे 5,000 रुपये आणि केंद्र सरकारचे 2,000 रुपये मिळाल्यामुळे यंदा सर्वसामान्यांची दिवाळी अत्यंत आनंदात आणि मोठ्या प्रमाणावर साजरी झाली, असे कौतुक त्यांनी केले. शेवटी, वाढत्या तंत्रज्ञानावर भाष्य करताना त्यांनी नागरिकांना मोबाईलच्या अतिवापरापासून सावध राहण्याचा सल्ला दिला. मोबाईलमुळे लोक वेडे झाले असून, ही एक महत्त्वाची वस्तू असली तरी ती सतत उघडी ठेवू नका, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.






