लोणी काळभोर, ता. 17 : पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी (ता. हवेली) गावच्या हद्दीत भरधाव लक्झरी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पोमधील तीन तृतीयपंथी जखमी झाले असून दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने कुंजीरवाडी येथील मोरया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सोमवारी (ता. 16 ) पहाटे साडेचारच्या सुमारास हॉटेल सत्कार ग्रँड लॉजसमोर घडला.

रुबीना ताज (वय 45), सानिया (वय 38) आणि कवाना (वय 30) अशी जखमी झालेल्या तृतीयपंथीयांची नावे आहेत.
याप्रकरणी नासिर फरीदशहा जमादार (वय 47, रा. मिरज, जि. सांगली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार लक्झरी बसचालक मोहम्मद समीर खाशीनसाहब मुल्ला (वय 26, रा. एरंडी, ता. हुमनाबाद, जि. बिदर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नासिर जमादार हे आपल्या फोर्स मोटर्सच्या टेम्पो ट्रॅव्हलरमधून सात तृतीयपंथीयांना घेऊन मिरज येथून थेऊरमधील वृंदावन मंगल कार्यालय येथे आयोजित तृतीयपंथीयांच्या संमेलनासाठी आले होते. पहाटे लवकर पोहोचल्याने प्रवाशांना फ्रेश होण्यासाठी खोली मिळते का, याची चौकशी करण्यासाठी ते कुंजीरवाडी येथील हॉटेल सत्कार ग्रँड लॉजसमोर थांबले होते. त्यावेळी जमादार हे दोन तृतीयपंथीयांसह लॉजमध्ये चौकशीसाठी गेले होते, तर अन्य पाच जण वाहनात बसले होते.

दरम्यान, हैदराबादहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रान्स इंडिया कंपनीच्या लक्झरी बसने (एमपी 01 झेडजी 9922) उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत रुबीना ताज , सानिया आणि कवाना हे तिघे जखमी झाले, तर अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बसचालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात वाहन चालविल्याने हा अपघात झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या अपघातात टेम्पोचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी बसचालक मोहम्मद समीर खाशीनसाहब मुल्ला याच्यावर मोटरवाहन अधिनियम, 1988 – 119,134,177,184 ; भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 125(a),281 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.






