पुणे : शहरातील नागरिकांसाठी आणि वाहनचालकांसाठी आज महत्त्वाची वाहतूक सूचना जारी करण्यात आली आहे. श्री संत शंकर महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त आयोजित विविध धार्मिक सोहळ्यांमुळे आज 17 नोव्हेंबर 2026 रोजी सातारा रोड परिसरात वाहतूक व्यवस्थेत मोठे फेरबदल केले आहेत. या उत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

या बदलांनुसार, रात्री 12 वाजेपर्यंत गरजेनुसार चव्हाणनगर कमान ते अहिल्यादेवी चौक या भागातील उड्डाणपुलाखालचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे.
वाहनचालकांनी खालील पर्यायी रस्त्यांचा वापर करावा:

के. के. मार्केटच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी स्वामी विवेकानंद पुतळ्यापासून कुंभारवाडा मार्गे पुढे जाऊन उजवीकडे वळावे आणि अहिल्यादेवी चौक व बालाजीनगर मार्गे आपला प्रवास पूर्ण करावा.
धनकवडी भागात जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी पद्मावती, विणकर सभागृह आणि होंडा शोरूम या मार्गाचा अवलंब करत तीनहत्ती चौकातून पुढे जावे.
या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी विशेष पार्किंग झोन निश्चित करण्यात आले आहेत. फक्त दुचाकी वाहने उभी करण्यासाठी सातारा रस्त्यावरील गुरुरज सोसायटी परिसर आणि पद्मावती ते शारदा आर्केड या दरम्यानचा बीआरटी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर, दुचाकी आणि चारचाकी अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहाचे पार्किंग, शेतकरी हॉटेल तसेच टेंभे माला या परिसरात जागा राखीव ठेवण्यात आली आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवास सुखकर होण्यासाठी पुणेकरांनी या नियमांचे पालन करावे, तसेच वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे






