मुंबई : वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्याचे बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. वरळी येथील महाराष्ट्र राज्य कामगार विमा योजनेच्या (ESIC) कार्यालयात कार्यरत असलेले लेखा अधिकारी तथा सहायक संचालक जितेंद्र साखरकर (वय 50) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. 7.50 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून, त्यातील पहिला हप्ता म्हणून 50 हजार रुपये स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली.

या प्रकरणातील तक्रारदार व्यावसायिकाच्या कंपनीला वैद्यकीय उपकरणे पुरवण्यासाठी 16.28 कोटी रुपयांचे कार्यादेश देण्यात आले होते. कंपनीने उपकरणांचा पुरवठा केल्यानंतर संबंधित बिले मंजुरीसाठी कार्यालयात सादर केली होती. मात्र, गेल्या 7 महिन्यांपासून ही बिले प्रलंबित होती.
16 नोव्हेंबर रोजी त्यापैकी 7.50 कोटी रुपयांचे बिल मंजूर करण्यात आले. या मंजुरीच्या मोबदल्यात साखरकर यांनी तक्रारदाराकडे 7.50 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. यानंतर संबंधित व्यावसायिकाने मुंबई ACB कार्यालयात तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वरळीतील ESIC कार्यालयात सापळा रचला. सोमवारी (16 नोव्हेंबर) सायंकाळी 6.55 वाजण्याच्या सुमारास साखरकर 50 हजार रुपये स्वीकारत असताना पथकाने त्यांना पकडले.
कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला. तसेच त्यांच्या बॅगेत लाचेच्या रकमेशिवाय आणखी 50 हजार रुपये रोख आढळल्याची माहिती आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीच्या निवासस्थानी झडती घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ACB च्या पुढील तपासातून या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.






