पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या भागातील नॉर्थ मेन रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी खासगी जागांचे सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या प्रक्रियेसाठी सुमारे 21 कोटी 40 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यामुळे कोरेगाव पार्कमध्ये वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत आहे. ही समस्या कमी करण्यासाठी विकास आराखड्यानुसार नॉर्थ मेन रस्ता 30 मीटर रुंद करण्याचे नियोजन आहे. मात्र, सध्या या रस्त्याची रुंदी केवळ 11 ते 14 मीटर इतकी आहे. त्यामुळे रस्त्याच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता आहे.
कार्निव्हल चौक ते ताडीगुत्ता चौक या दरम्यानच्या रस्त्यासाठी सुमारे 3,040 चौरस मीटर खासगी जागा संपादित केली जाणार आहे. मात्र, यापूर्वी रस्ता रुंदीकरणासाठी जमीन दिलेल्या काही मालकांना अद्याप मोबदला मिळालेला नसल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे नवीन भूसंपादनाला काही जागामालकांचा विरोध आहे.

महापालिकेने यापूर्वी जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, सहमती न झाल्याने प्रशासनाने सक्तीच्या भूसंपादनाचा पर्याय निवडला. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आवश्यक रक्कम जमा करावी लागणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनीही रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन आवश्यक असल्याचे सांगितले.
दरम्यान, शहरातील अनेक रस्ते वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपुरे पडत आहेत. टीडीआर आणि एफएसआयच्या माध्यमातून जागा मिळवण्याचे प्रयत्न होत असले, तरी काही मालक रोख मोबदल्याची मागणी करतात. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाची कामे रखडत असल्याचे चित्र आहे.






