पुणे : भोंदूबाबा अशोक खरात याच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाच्या नावावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट 20 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, चित्रपटाच्या नावात ‘महाराष्ट्र’ या शब्दाचा वापर केल्याबद्दल काही संघटनांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपटाच्या नावातून महाराष्ट्राचा उल्लेख काढून टाकावा, अशी मागणी हिंदू सेवा संघ आणि मराठा विकास मंचाचे अध्यक्ष रोहित मारणे यांनी केली आहे.

रोहित मारणे यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करताना महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा उल्लेख केला आहे. महाराष्ट्राला संतांची, समाजसुधारकांची आणि शूरवीरांची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच भूमीत स्वराज्याची स्थापना केली. तसेच शिव, शाहू, फुले, आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांसारख्या महान व्यक्तींनी महाराष्ट्राची ओळख देशभर निर्माण केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अशोक खरात याच्यासारख्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या नावात महाराष्ट्राचा उल्लेख करणे म्हणजे राज्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्यासारखे असल्याचे मारणे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शकांनी चित्रपटाचे नाव तातडीने बदलावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणात राज्य सरकार आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळानेही लक्ष घालावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा हिंदू सेवा संघ, मराठा विकास मंच आणि महाराष्ट्रप्रेमी संघटनांच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल. तसेच चित्रपटाचे प्रदर्शन होऊ दिले जाणार नाही, असा इशाराही रोहित मारणे यांनी दिला आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाच्या नावावरून वाद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







