इंदापूर : वालचंदनगर-नातेपुते मार्गावरील कळंबोली (ता. सोलापूर) येथील नीरा नदी पुलावरील संरक्षण कठडा तोडून चारचाकी गाडी थेट नदीत बुडाली असून, या अपघातात दोघेजण थोडक्यात बचावले आहेत. या घटनेत चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ०३) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सागर अशोक घोडके वय २८ (रा. सांगली नं. १, ता. करमाळा जि. सोलापूर) त्यांचे मेहुणे सुशांत विष्णू राजेमाने (रा. कळंबोली ता. इंदापूर) हे दोघे चारचाकी गाडीतून चालले होते.
इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर-नातेपुते मार्गावरील कळंबोली (ता. सोलापूर) नजीकच्या नीरा नदी पुलावर समोरून येणाऱ्या वाहनाच्या लाइटच्या तीव्र प्रकाशामुळे संरक्षण कठडा तोडून स्विफ्ट गाडी नीरा नदीत बुडाली. या अपघातात दोघे जण बचावले असून, यात गाडीचे मोठे नुकसान झाले.
मेहुण्यास कळंबोली येथे सोडण्यासाठी इंदापूर, जंक्शन, वालचंदनगर या मार्गे कळंबोली येथे वालचंदनगर नातेपुते रोडने जात होते. प्रवीण ढाब्याच्या नजीक विरुद्ध दिशेने नातेपुते बाजूने येणाऱ्या चारचाकी वाहनाने कट मारल्याने, या वाहनाचे लाइटचा उजेडामुळे चालकाला समोरील कळंबोली पुलाचा अंदाज न आल्याने, चालकाचा वाहनावरील ताबा सुटला चारचाकी गाडी थेट पुलावरून खाली नदीच्या पाण्यात कोसळली.
दरम्यान, या पुलावर काही प्रमाणात शिल्लक राहिलेल्या लोखंडी संरक्षण कठड्याला धडकून नीरा नदीच्या पाण्यात ही गाडी पडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. खबर देणार व मेहुणा असे गाडीतून बाहेर पाण्यातून पोहत नदी किनारी आले. यामध्ये पाण्यामध्ये पडून गाडीचे नुकसान झाले असून, ही गाडी बुधवारी (ता. ०४) क्रेनच्या साहाय्याने नदीतून बाहेर काढण्यात आली.