बुलढाणा : ग्रामीण भागातून बुलढाणा शहराच्या ठिकाणी जात असताना दुचाकीस्वारावर मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाल्याची विचित्र घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात रविवारी (ता. १९) सकाळी साडेनऊ वाजता हि घटना घडली आहे.
जगन्नाथ नामदेव देवळे (वय – ५८, रा. अंत्रज, ता. खामगाव, जि. बुलढाणा) असे मधमाश्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अग्निशमन दलाच्या गाडीने पाण्याचे फवारे सोडल्यानंतरही मधमाशांनी दुचाकीस्वाराला दंश करणे सोडलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी जगन्नाथ देवळे हे त्यांच्या दुचाकीवरून खामगावला निघाले होते. गावापासून तीन किलोमीटर पेक्षा अधिक अंतर कापल्यानंतर गारडगाव नजीक सिंधी नाल्यावर अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळेचे दुचाकीवरुन ते जागीच खाली कोसळले. खाली कोसळ्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर शेकडो मधमाशांनी दंश केला. त्यातच ते बेशुद्ध झाले.
त्यानंतरही तब्बल दोन तासांपेक्षा अधिक काळ मधमाशा त्यांच्या भोवती घोंगावत होत्या. यावेळी रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची दोन्ही बाजूंनी गर्दी झाली होती. ग्रामस्थांना माहिती दिल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने नगरपालिकेचे अग्निशमन विभागाची गाडी बोलावली. घटनास्थळी दाखल झालेल्या वाहनातून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या जगन्नाथ देवळे यांच्यावर पाण्याचे फवारे सोडण्यात आले.
दरम्यान, मधमाशांनी त्यांना दंश करणे सोडलं नाही. उलट मधमाशांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या दिशेने आपला मोर्चा वळविला. त्यामुळे मधमाशांनी कर्मचाऱ्यांनाही दंश केलं. जीवाच्या भीतीने कर्मचाऱ्यांनी गाडीच्या केबिनची मदत घेतली. काही वेळानंतर देवळे यांना खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.