पुणे : मार्केट यार्ड येथे भरदिवसा गोळीबार करुन २८ लाखाची रोकड लुटणाऱ्यांना ७ जणांना टोळीला खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल ११ लाखाची रोकड, तीन दुचाकी, मोबाईल असा सुमारे १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अविनाश उर्फ सनी रामप्रताप गुप्ता ( वय 20, मंगळवार पेठ), आदित्य अशोक मारणे (वय २८, रा. रामनगर,वारजे), दिपक ओम प्रकाश शर्मा ( वय १९, राहुलनगर, शिवणे), विशाल सतीश ( वय २०, मंगळवार पेठ), अजय बापू दिवटे ( वय २३, श्रीराम चौक, वारजे), गुरुजनसिंह सेवासिंह विरक (वय २२, वर्षे,शिवाजीनगर), निलेश बाळू (वय २०, एस. आर. ए. स्कीम, मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड येथील गेट नंबर दोन येथे गणराज मार्केट नावाची इमारत आहे. संबंधित इमारतीमध्येच द प्रोफेशनल कुरिअर नावाने अंगडीयाचा व्यावसाय चालतो.
तर इमारतीच्या पाठीमागील बाजुस असलेल्या पोटमाळावजा जागेत त्याचे कार्यालय आहे. अंगडीयाच्या कार्यालयात दोन कर्मचारी उपस्थित होते. ते काचेच्या केबिनमध्ये बसून त्यांचे नियमीत काम करीत होते.
त्यावेळी एक व्यक्ती तेथे आला, त्यानंतर तो थेट कर्मचारी काम करीत असलेल्या काचेच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करु लागला.
त्यानंतर आरोपींनी अंगडीयाच्या कार्यालयात भरदिवसा घुसून गोळीबार करीत २८ लाख रुपयांची शनिवारी (ता.१९) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास चोरी झाली होती. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आरोपींना पकडण्यासाठी खंडणी विरोधी पथकाला सूचना दिल्या होत्या.
दरम्यान. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, खंडणी विरोधी पथकाने सदर गुन्ह्याचा छडा लावून अवघ्या दोन दिवसातच ७ आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपींकडून ११ लाखाची रोकड, तीन दुचाकी, मोबाईल असा सुमारे १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.