नगर : डॉक्टर असल्याची बतावणी करून एका बोगस डॉक्टरने गेल्या दोन दिवसापासून खंडोबावाडी (ता. पाथर्डी) येथील तब्बल ४० हून अधिक नागरिकांना जनावरांचे इंजेक्शन दिल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी बोगस डॉक्टरला अटक केली आहे.
राजेंद्र जवंजळे असे अटक करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र जवंजळे याने डॉक्टर असल्याचे सांगून खंडोबावाडी येथील जवळपास ४० हून अधिक महिला आणि पुरूषांना इंजेक्शन दिले आहे. या बोगस डॉक्टरला गावातील काही जागरूक तरूणांना संशय आला. त्यानंतर तरुणांनी डॉक्टरच्या बॅगेतील इंजेक्शनच्या बाटल्या तपासल्या असता त्या बाटल्यावर जनावरांची चिन्हे आढळून आली आहेत.
तरुणांनी तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर बाबासाहेब होडशीळ यांच्या ताब्यात बोगस डॉक्टर दिले. तिसगाव येथे बोगस डॉक्टर राजेंद्र जवंजळे यांच्या बॅगेतील औषधांची खातरजमा करण्यात आला. त्याच्यावर पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी राजेंद्र जवंजळे याने दोन दिवसापासून खंडोबावाडी येथील नागरिकांना मान, गुडघा आणि पाठदुखीवर उपचार करून इंजेक्शन दिले आहे. तसेच त्याने ज्या ठिकाणी दुखत आहे. त्याच ठिकाणी इंजेक्शन देऊन प्रत्येकाकडून पाचशे रुपये उकळले.
या घटनेची माहिती मिळताच, आरोग्य विभागानेही तातडीने संबंधित उपचार घेतलेल्या नागरिकांची तपासणी सुरू केली आहे. जर कुणाला काही त्रास होत असल्यास, त्याने तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क करा. असे आवाहन केले आहे. तसेच अशा पद्धतीने कुणी बोगस डॉक्टर निदर्शनास आल्यास, त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क करण्याचेही आवाहन केले आहे.