पुणे, ता.२१ : हडपसर (आकाशवाणी) ते कवडीपाट टोलनाका या दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर फळे, भाजीपाला व इतर चिजवस्तू विकणाऱ्या हातगाड्यांनी, टेंपोंनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. तर फुरसुंगी फाटा ते कवडीपाट या दरम्यान भाजीवाल्यांनी थेट रस्त्यात येऊन फळ व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. हे कमी की काय म्हणून महामार्गाच्या दोन्ही बाजूंना रात्रंदिवस पार्क होत असलेली अवजड वाहने, यामुळे हडपसर (आकाशवाणी) ते कवडीपाट टोल नाका या दरम्यानच्या रस्त्याची पुरती वाट लागली आहे.
हडपसर (आकाशवाणी) ते कवडीपाट टोल नाका या दरम्यान दोन्ही बाजूच्या रस्त्यात येऊन फळ व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या हातगाड्या, टेंपो, विविध प्रकारचे दुकानदार, फेरीवाले, भाजी विक्रेते, टेंपो याबरोबरच पार्क होत असलेली अवजड वाहने, महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकांना दिसतात; मात्र, अतिक्रमणे काढण्याची जबाबदारी असलेल्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाला मात्र वरील बाब दिसत नसावी का, असा प्रश्न रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांना पडला आहे. हडपसर (अकाशवाणी) ते कवडीपाट टोल नाक्या दरम्यान अतिक्रमणांमुळे महामार्गाची पुरती वाट लागली असतानाही वरील तीनही खाती आंधळ्याच्या व मुक्याच्या भुमिकेत वावरत असल्याचा सूर नागरिकांमधून उमटू लागला आहे.
हडपसर (अकाशवाणी) ते कवडीपाट टोल नाका या दरम्यानच्या रस्त्याची वाट लागल्याने, पुणे-सोलापूर महामार्गावरुन लोणी काळभोर बाजूने पुण्याला तर पुण्याहून लोणी काळभोरकडे ये-जा करणाऱ्या स्थानिक नागरिकांना व बाहेर गावावरुन पुण्याला ये-जा करणाऱ्या प्रवासी वाहनांना या ठिकाणावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हडपसर गावात पुलाखाली रस्त्यावर गर्दी ओसंडून वाहत आहे. अतिक्रमणचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. मात्र, हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेला अतिक्रमण विभाग मूग गिळून गप्प बसला आहे.
हडपसर-गाडीतळ ते गांधी चौक आणि मगरपट्टा चौक ते गाडीतळ दरम्यानचा पदपथ आणि सायकल ट्रॅक पुन्हा दुकानदार, फेरीवाले, भाजीविक्रेत्यांनी व्यापला आहे. आकाशवाणी ते पंधरा नंबर या दरम्यान रस्ता अरुंद असूनही, हडपसरवरून पंधरा नंबरकडे जाणाऱ्या रस्त्यावर फळांची विक्री करणाऱ्या गाड्या राजरोसपणे व्यवसाय करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर मांजरी हद्दीतील मांजरी बाजारापासून रुकारी पेट्रोल पंपापर्यंत तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळ विक्रते, भाजी पाला विक्रत्यांनी रस्त्यातून चालणेही महाग करुन टाकले आहे.
हडपसर ते कवडीपाट या सुमारे पाच किलोमीटर रस्त्याचे तसेच पुणे-सोलापूर महामार्गाचे चार-साडेचार वर्षांपूर्वी रूंदीकरण झाले आहे. मात्र, या रुंदीरकरणाचा फायदा रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना न होता, तो फक्त रस्त्यावर फळे, भाजीपाला व इतर चिजवस्तू विकणाऱ्या हातगाड्या, विविध वस्तूंची विक्री करणारे टेंपो, टपऱ्या चालकानांच झाला आहे.
फुरसुंगी ते कवडीपाट या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंची जागा ही भाजीपाला व फळे विक्रेत्यांना कायदेशीर देऊनच टाकली, अशी परिस्थिती आहे. हडपसर ते कवडीपाट या सुमारे पाच किलोमीटर रस्त्यात वाहतुकीला अडथळा ठरणारे आणि पादचाऱ्यांसाठीचे पदपथावरील अतिक्रमणे हटविण्याचे काम हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाने करणे अपेक्षित आहे. मात्र, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभाग रस्त्यामधील अतिक्रमणांवर आर्थिक हितसंबंधामुळे डोळेझाक करत आहे का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
‘हित’संबंधामुळे सर्वांचेच हात वर?
हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त आणि अतिक्रमण विभागाचे प्रमुख यांच्याकडे वारंवार तक्रार केल्यानंतर, त्यांच्याकडून ते काम आमचे नाही, पोलिसांचे आहे, असे सांगितले जाते. हडपसर पोलिसांना फोन केल्यास, पोलीस म्हणतात ते काम पालिकेचे आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार होणाऱ्या वाहतुक कोंडीचा व वाहतुक पोलिसांचा दूर दूर संबंध नसावा असेच वाहतुक पोलिसांचे वागणे असते. यामुळे वरील काम नक्की कोणाचे, यावर एखादी आंतरराष्ट्रीय संशोधन समिती नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.
शेवाळेवाडी बस डेपोसमोर (अधिकृत??) दुकानांची निर्मिती…
शेवाळेवाडी बस डेपोसमोर भिंतीलग रस्त्याच्या बाजूला मागील काही दिवसांपासून अनधिकृत पत्र्याच्या शेडमध्ये मांस विक्रीची दुकाने चालवली जात होती. मात्र, मागील १५ दिवसांपूर्वी त्याच ठिकाणी १० ते १५ पत्र्याचे पक्के शेड उभारले गेले आहेत. या शेडमध्ये विविध प्रकारचे व्यवसाय चालू झाले असतानाही, त्या जागेचे मालक असलेल्या बस डेपोच्या अधिकाऱ्यांनी अथवा अतिक्रमण विभागाच्या प्रमुखांनी त्याकडे लक्ष दिलेले नाही, ही बाब महत्वाची आहे. उद्या संबधित ठिकाणी दुकानदारांनी सिमेंट-क्रॉंक्रिटचे बांधकाम केल्यावरही, वरील अधिकारी दुर्लक्ष करणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.