सांगली : राज्यभरात गणपती विसर्जनाची तयारी सध्या जोरदार सुरु आहे. तरूणाईही याच कामात मोठ्या प्रमाणात व्यस्त आहे. त्यासाठी डीजे, लाईट सिस्टिमसह इतर तयारी केली जात आहे. असे असताना याच डीजेचा आवाज दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडली.
सांगली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी या दुर्दैवी घटना घडल्या. यामध्ये पहिली घटना वाळवा तालुक्यातील दुधारी येथे तर दुसरी घटना तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे घडली. यात प्रवीण शिरतोडे (वय 35 रा. दुधारी) तर शेखर पवाशे (वय 32, रा. कवठेएकंद) या तरुणांचा मृत्यू झाला.
शेखर पवाशे हा 32 वर्षीय तरूण कवठेएकंद येथील गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. मिरवणूकीत डीजेच्या आवाजाने त्याला त्रास होऊ लागला. त्यानंतर लगेचच तो घरी परतला. घरी येताच भोवळ येऊन खाली पडला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांना मृत घोषित केले.
शेखरला चार वर्षांची मुलगी
शेखर पावशे याचे पलूस येथे चारचाकी वाहने दुरुस्तीचा व्यवसाय होता. त्याच्या पश्चात पत्नी, चार वर्षांची एक मुलगी, वडील, भाऊ असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
काम करून घरी आला, मिरवणुकीत गेला
दुधारी येथे राहणाऱ्या प्रवीण शिरतोडे या 35 वर्षीय तरुणाचा सेंट्रिंगचा व्यवसाय आहे. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास तो कामावरून घरी परतला. घरी पोहोचताच गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला. काही वेळ तो मित्रांसोबत मिरवणुकीत नाचला. मात्र, काही वेळाने त्याला अस्वस्थ वाटू लागले. चक्कर येऊन खाली पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.