जीवन सोनवणे
भोर, (पुणे) : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात शिरगाव (ता. भोर) ग्रामपंचायत हद्दीत महाड चिपळूणकडे जाणारी मिनीबस ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत चालक ठार झाला असून चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मध्यरात्री दोनच्या सुमारास झाला आहे
अजिंक्य संजय कोलते रा. धनकवडी, पुणे असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या अपघतात राजेंद्र लाला मिसाळ रा. पद्मावती पुणे, रमेश तुकाराम महाडिक रा.पुणे सुभाष कदम राहणार पुणे, करिष्मा उत्तम कांबळे रा. सिंहगड पुणे असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेटवरून अजिंक्य कोलते हे १० व्यक्तींना घेऊन भोर- महाड मार्गे चिपळूणकडे वरंध घाटातून निघाले होते. स्त्याचा अंदाज न आल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले. व गाडी ६० फूट दरीत कोसळली. यावेळी चालक कोलते यांनी दरीतून वरती येऊन स्थानिकांनी याबाबत माहिती दिली.
हॉटेल मालक दत्ता पोळ, अक्षय धुमाळ, भीमा पोळ, संतोष पवार या शिरगावच्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन अधांतरीत असलेल्या बसला प्रथम दोरीने बांधले व त्यानंतर अपघातग्रस्त गाडीतीतील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले.त्यानंतर लागलीच पोलीस स्टेशन ला माहिती कळवली असता अपघाताची माहिती मिळताच घटना स्थळी भोर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील आपल्या सहका-यांसह , रेस्क्यु टीमसह घटनास्थळी दाखल झाले
दरम्यान, यावेळी अपघातातील पाच जखमी प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालय भोर या ठिकाणी उपचार कामी पाठवण्यात आले. या अपघातात जखमींपैकी चालक अजिंक्य कोलते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर जखमींवर उपचार सुरु आहेत.