पुणे : पुण्यासह राज्यात गाजलेल्या डबल मोक्का प्रकरणी अटकेत असलेल्या नानासाहेब गायकवाड याच्यावर येरवडा कारागृहाच्या आवारात तीक्ष्ण शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.३) दुपारच्या सुमारास घडली आहे.
गायकवाड आणि कारागृहातील कैद्यांमध्ये दोन महिन्यांपूर्वी हाणामारी झाली होती. त्यातूनच हा हल्ला झाला असल्याची माहिती मिळत आहे. कैद्यांनी कारागृहातील पत्र्याच्या साहाय्याने त्याच्यावर तीक्ष्ण वार केले असल्याचे वैदकीय तपासणीत आढळले आहे.
दरम्यान, कैद्यांच्या सुरक्षिततेबाबत कारागृह प्रशासनाने कडक उपाययोजना लागू केल्या असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर येरवडा कारागृहात अलीकडच्या काळात तीन मारामाऱ्या झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.
कारागृहात स्वतंत्र व्यवस्था होण्यासाठी गायकवाड यानेच हा बनाव रचला आहे ? किंवा कसे याबाबत पोलिसांनी तपास जारी केला आहे.
आरोपी नानासाहेब शंकरराव गायकवाड याच्यासह त्यांचा मुलगा गणेश गायकवाडसह, सचिन वाळके, संदीप वाळके व त्याच्या साथीदारांविरोधात मागील काही वर्षाच्या कालावधीमध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी व जबर दुखापतीसाठी पळवुन नेणे, दुखापत करणे, अवैध सावकारी आणि बळजबरीने जमिनी हडप करणे, बेकादेशीर जमाव जमविणे, कट रचून बनावटीकरण करून फसवणूक करणे, डांबून ठेवणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक अग्नीशस्त्र बाळगणे, अवैधरीत्या पठाणीपद्धतीने सावकारी करणे वगैरे गंभीर स्वरुपाचे गुन्हे पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.