पुणे : लातूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक असून पुणे मुंबई ठिकाणी कामाला असलेली अनेक लातूरकर गावाकडे मतदानासाठी जाणार असल्याने मुंबई बिदर एक्सप्रेस काल रात्री मुंबईवरून येतानाच प्रचंड गर्दीने भरून आली होती.
त्यानंतर ही गाडी पुणे रेल्वे स्टेशनवर आली असता गाडीत जागा नसल्याने आतील प्रवाशांनी गर्दीमुळे दरवाजे बंद करून घेतले. त्यामुळे बाहेरील प्रवाशांनी रेल्वे स्थानकात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
शनिवारी रात्रीच्या सुमारास हा गोंधळ झाला पुणे आणि जवळील भागातून लातूरच्या दिशेने येणाऱ्या लातूरकरांनी एक्सप्रेसमध्ये बसण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्यांना रेल्वेत येऊ दिले नाही अखेर प्रवाशांनी रेल्वे इंजिन समोर ठाण मांडले. यावेळी संतप्त प्रवाशांनी जोरदार घोषणाबाजी केली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी तातडीने धाव घेतली. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या प्रवाशांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजे उघडल्याशिवाय रेल्वे हालू देणार नाही अशी भूमिका प्रवाशांनी घेतली.
विलासराव देशमुख यांनी ही गाडी सुरू केलेली आहे आणि लातूरकरांना जागा नाही असा संताप व्यक्त करत महिला प्रवाशांनी जोरदार घोषणाबाजी केली.
अखेर रेल्वे पोलिसांनी सर्व परिस्थिती हाताळत रेल्वेच्या बोगीची दारे उघडली सर्व प्रवाशांना व्यवस्थितपणे रेल्वेत बसवण्यास जवळपास दोन तास गेले त्यामुळे ही एक्सप्रेस दोन तास उशिराने धावली.