उरुळी कांचन : विहिरीवरील पाण्याची मोटार सुरू करण्याच्या क्षुल्लक कारणावरून सख्ख्या पुतण्यावर अन् भावावर काठ्या आणि लोखंडी टाच्याने हल्ला केल्याची घटना घडली. पेठ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (ता. 20) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी चुलते आणि चुलत भावाविरुद्ध उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष साहेबराव गायकवाड, कांतीलाल साहेबराव गायकवाड, चुलत भाऊ श्रेयष संतोष गायकवाड (सर्व रा. पेठ, ता. हवेली) असे मारहाण करणाऱ्या तिघांची नावे आहेत. याबाबत शुभम विलास गायकवाड (वय 25, व्यवसाय शेती रा. पेठ ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शुभम हे त्यांचे वडील विलास यांच्यासोबत शेतात शेपू काढत होते. त्यावेळी मोटारीचे पाणी बंद झाल्याने शुभम विहिरीकडे गेले. तेथे त्यांचे चुलते संतोष आणि कांतीलाल आधीच उपस्थित होते. “आज तुमची मोटार चालू करण्याची पाळी नाही, मग मोटार का चालू केली?” असा जाब विचारत दोघांनी शुभम यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर वडील विलास तेथे आले. त्यांनी मोटार सुरू करण्यासाठी वायर जोडल्याचे सांगितल्यानंतरही वाद सुरू राहिला.

फिर्यादीनुसार, संतोष आणि कांतीलाल यांनी विलास यांना हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. वडिलांना सोडवण्यासाठी शुभम मध्ये गेले असता त्यांनाही मारहाण करून खाली पाडल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी वाटेकरी साहेबराव टकले यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले.
यानंतर शुभम यांनी भाऊ सचिन याला फोन करून प्रकाराची माहिती दिली. सचिन घरी आल्यानंतर वडील व भावाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी तो संतोष आणि कांतीलाल यांच्या सिमेंट पाइप कंपनीत गेला. शुभमही त्याच्या मागे गेले. तेथे संतोष, कांतीलाल आणि त्यांचा मुलगा श्रेयस उपस्थित होते. सचिनने शिवीगाळ करू नका, असे सांगितल्यानंतर तिघांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी श्रेयसने लाकडी काठीने सचिनच्या डोक्यात जोरदार वार केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
शुभम यांनी आरडाओरड केल्यानंतर विलास तेथे आले. ते सचिनला सोडवण्यासाठी गेले असता संतोष आणि कांतीलाल यांनी त्यांना लाकडी काठ्यांनी मारहाण करून खाली पाडल्याचा आरोप आहे. त्यानंतर श्रेयसने लोखंडी टाच्याने विलास यांच्या डोक्यात वार केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.शुभम भांडण सोडवण्यासाठी मध्ये गेले असता संतोषने हातातील काठीने त्यांच्या डाव्या हाताच्या दंडावर जोरदार प्रहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणी शुभम गायकवाड यांच्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार उद्धव गायकवाड करीत आहेत.







