पुणे: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन कुऱ्हाडीने तिची हत्या करणाऱ्या पतीला पुणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीला 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या खटल्यात आरोपीच्या मुलीने वडिलांविरोधात दिलेली साक्ष आणि त्याच्या शर्टवर आढळलेले रक्ताचे डाग महत्त्वाचे पुरावे ठरले. बाबासाहेब मारुती जाधव (वय 53, रा. बुरकेगाव, हवेली) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

ही घटना 23 जुलै 2024 रोजी घडली होती. बाबासाहेब जाधव याला मद्यपानाचे व्यसन होते. तो पत्नी लक्ष्मी यांच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असे. याच कारणावरून तो पत्नीला मारहाणही करत होता. घरातील सततच्या वादाला कंटाळून त्यांचा मुलगा वेगळा राहू लागला होता.
लक्ष्मी आणि त्यांची मुलगी एकाच कंपनीत नोकरीला होत्या. दोघीही दररोज बसने एकत्र कामावर जात असत. घटनेच्या दिवशी लक्ष्मी कामावर न आल्याने मुलगी आपल्या पतीला घेऊन आईच्या घरी पोहोचली. मात्र, घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे त्यांनी दरवाजा लाथ मारून उघडला. घरात प्रवेश केल्यानंतर लक्ष्मी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळल्या. त्याच खोलीत आरोपी पती अंगावर पांघरूण घेऊन झोपलेला होता.

मुलीने वडिलांना उठवून आईबाबत विचारणा केली असता, त्यांनी कुऱ्हाडीने वार करून पत्नीचा खून केल्याचे सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात सरकारी वकील नितीन कोंढे यांनी 8 साक्षीदार तपासले. शवविच्छेदन अहवालात मृत महिलेच्या शरीरावर 10 ठिकाणी वार आणि 4 ठिकाणी कापल्याच्या जखमा असल्याचे स्पष्ट झाले. पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांचा विचार करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. भोसले यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.






