मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन ”डॅडी” अर्थात अरुण गवळी यांच्या पत्नी आशा गवळी यांचा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील दोषमुक्त अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्या आहेत.
ग्लोब ऑटो इलेक्ट्रिकल्स १९९८ मध्ये कंपनी बंद झाली होती. कंपनी बंद झाल्यानंतर अखिल भारतीय कामगार सेनेला ४ कोटी देण्यात आले. जे कर्मचाऱ्यांना देण्यात येणार होते. मात्र नोकऱ्या गमावलेल्या ४६९ कर्मचाऱ्यांना १ कोटी ७७ लाख रुपयांच्या निधी मिळाली नाही. थकबाकी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी २ डिसेंबर २००६ रोजी एबीकेएस आणि एबीएस यांच्या विरोधात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.
त्यानुसार एबीएसचे अध्यक्ष अरुण गवळी उपाध्यक्ष आशा गवळी कोषाध्यक्ष सुनील कालेकर आणि शिव शंभो नारायण ट्रस्टचे विश्वस्त विजय गवळी यांनी गुन्हेगारी कट रचून १ कोटी ७७ लाखाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी आशा गवळी यांनी हा वाद दिवाणी स्वरूपाचा असल्याचा दावा करून दोषमुक्तीची मागणी केली होती. तर तक्रारदारांनी यापूर्वीच तक्रार मागे घेतली होती.
पोलीस तपासात रेकॉर्डवरील पुराव्यावरून असे सिद्ध होते की, १५० बेअरर चेक वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे तयार करण्यात आले होते. त्या धनादेशांवर आरोपी क्रमांक १ अरुण गवळी आणि आरोपी क्रमांक २ आशा गवळी यांच्या स्वाक्षरी होत्या. त्याद्वारे ते धनादेश अखिल भारतीय सेनेच्या कर्मचार्यांमार्फत रोखण्यात आले आणि बँकेतून काढलेली रक्कम आरोपी क्रमांकआरोपी अरुण गवळीला देण्यात आली. ती रक्कम कर्मचाऱ्यांना वितरित करणे आवश्यक होती असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आशा गवळी दोष मुक्तीचा याचिका फेटाळली होती. त्यानंतर आशा गवळीने दोष मुक्तीची याचिका सत्र न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आशा गवळींच्या या याचिकेला विरोध केला होता. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने आशा गवळी यांचा दोषमुक्त अर्ज फेटाळला आहे.