Arrested | घारगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीला अखेर पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हा एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. ही कामगिरीर आळेफाटा ग्रामीण पोलिसांनी केली.
नवनाथ आनंदा चव्हाण ( वय ४०, रा. कोठे बुद्रुक, ता. संगमनेर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथून ताब्यात घेतले असून संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घारगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीत अल्पवयीन मुलीवर नवनाथ चव्हाण याने २३ एप्रिल २०२२ ला अत्याचार केला होता. त्यानुसार घारगाव पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो पसार होता.
दरम्यान, आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पसार असलेल्या आरोपींचा शोध मोहिमेबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशानुसार आळेफाटा पोलीस आरोपींचा शोध घेत असताना त्यांना पिंपळवंडी परिसरात एक संशयित व्यक्ती मिळून आली.
त्यांनी त्यास ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्याचे नाव नवनाथ चव्हाण असे समजले. त्याच्यावर घारगाव पोलीस ठाण्यात अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल आहे. तो गुन्हा घडल्यापासून पसार असल्याचे निष्पन्न झाले. आळेफाटा पोलिसांनी चव्हाण याला घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.