Arrested | पुणे : चंदनाची झाडे तोडून त्याची चोरी करण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. आता चोरट्यांनी थेट औंध परिसरातील राजभवन तसेच राष्ट्रीय रायायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) आवारातून चंदनाची झाडे कापून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. या चोरट्यांच्या टोळीला चतु:शृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून २५ किलो चंदनाची लाकडे जप्त करण्यात आली आहेत.
कैलास साहेबराव अगिवले (वय २१, रा. बाभुळवडे, जि. नगर), सुनिल सुरेश अगिवले (वय २०, रा. संगमनेर, नगर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. चोरट्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागात सात ठिकाणी चंदन चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींना पाषाण रस्त्यावरील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या परिसरातून अटक करण्यात आली. शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चंदन चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. राजभवन आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्यात आली होती.
पोलीस कर्मचारी सुरेश काशीद आणि अशोक ननवरे रात्रपाळीत गस्त घालत होते. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या आवारात आरोपींना पोलिसांनी पाहिले. पोलिसांना पाहताच दोघे जण पळाले. पोलिसांनी पाठलाग करुन दोघांना पकडले.
दरम्यान, आरोपी अगिवले यांच्याकडून २५ किलो चंदनाची झाडे जप्त करण्यात आली आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!