पुणे : दोन दिवसांपूर्वी लोणावळा येथील भुशी डॅम परिसरात मोठी दुर्घटना घडली होती त्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले होते. त्यानंतर आता प्रशासन चांगलेच खडबडून जागे झाले आहे. आठवड्यांच्या इतर दिवसांपेक्षा शनिवार-रविवार इथे जास्त गर्दी होत असते. लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली होती. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले.
पावसाळ्यात लोणावळ्यातील भुशी डॅम परिसर नेहमीच पर्यटकांनी भरलेला असतो. शनिवार-रविवार इथे जास्त गर्दी असते. भुशी डॅम परिसरात असणाऱ्या धबधब्यावर भिजण्यासाठी गेलेल्या अन्सारी कुटुंब काळाचा आघात झाला. अचानक धबधबा असलेल्या भागात पाण्याचा प्रवाह वाढला आणि अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेले.
अन्सारी आणि सय्यद कुटुंब या ठिकाणी वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी आले असता हि घटना घडली होती. साहिस्ता लियाकत अन्सारी (36), मिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी (13), अदनान अन्सारी (4), उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी (8), मारिया अन्सारी (9) वाहून गेले. या दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जाग झालं आहे. त्यांनी तातडीने पावल उचलली आहेत.
काय केली कारवाई?
लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी होत असते. त्यामुळे तिथे असणारी दुकाने आणि त्यातून निर्माण झालेले अतिक्रमण सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. भुशी धरण परिसरातील अतिक्रमण काढण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे. लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाकडून संयुक्त अतिक्रमण कारवाई सुरू आहे. भुशी धरण परिसरात चहा, नाष्टा, फेरीवाले, कणीस विक्रेते यांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे.
भुशी डॅम रेल्वेच्या मालकीचा..
भुशी डॅम रेल्वेच्या मालकीचे असल्याने, त्यांनी स्थानिक प्रशासनाची मदत घेतली आहे. वर्षविहारासाठी पर्यटक पावसाळ्यात भुशी धरण परिसराला पसंती देतात. मात्र या ठिकाणी अतिक्रमणामुळे मोठी दाटी झाली होती. दोन दीवसापूर्वी घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली. याची गंभीर दखल घेऊन कारवाईला सुरुवात केली आहे.