पुणे : कुख्यात गुंड तुषार हंबीर याच्यावर हल्ला करणाऱ्या हडपसर येथील गुंड नोन्या वाघमारे याच्यासह टोळीतील १२ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत. गुप्ता यांची ९७ वी मोक्काची कारवाई आहे.
१)टोळी प्रमुख प्रतिक ऊर्फ नोन्या संजय वाघमारे (वय-२२, रा.शांतीनगर वसाहत, हडपसर, पुणे), २) सागर हनुमंत ओव्हाळ (वय-२२, रा. बनकर कॉलनी, स.नं. १३, शांतीनगर वसाहत, हडपसर, पुणे) ३), बालाजी हनुमंत ओव्हाळ (वय-२३), ४) सुरज मुक्तार शेख (वय- १९, रा. हरपळे चाळ, भेकराई नगर, हडपसर), ५) सागर बाळासाहेब आटोळे (वय २१, रा. १० वा मैल, वडकी, पुणे), ६) ऋतीक ऊर्फ बबलु राजु गायकवाड (वय- १९, रा. बनकर कॉलनी, स.नं. १३, शांतीनगर वसाहत, हडपसर, पुणे), ७) अनिल अंकुश देवकते (वय २२, रा. आदर्शनगर, देवाची उरुळी, पुणे), ८) गालीब ऊर्फ समीर मेहबुब आत्तार (वय- १९, रा. संयुग कॉलनी, काळेपडळ, हडपसर, पुणे), ९) प्रकाश रणछोड दिवाकर उर्फ प्रकाशदास रणछोड दास वैष्णव (वय-२६, रा. भिमनगर, उत्तमनगर, पुणे), १०) परवेज उर्फ साहिल हैदरअली इनामदार (वय-२१, रा. तिरंगा चौक, गल्ली नं.७ आदर्शनगर, ऊरुळी देवाची, पुणे), ११) तम्मा ऊर्फ रोहीत सुरेश धोत्रे (रा. वडार वस्ती, पुणे (पाहीजे आरोपी) १२) साहील शेख ऊर्फ छोटा साहील, रा. हडपसर, पुणे) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे टोळीने बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण केली होती. आरोपींनी पुर्वीचे वादाच्या रागामधुन कट रचुन पिस्टल, तलवारी व कोयते या घातक हत्यारांसह बेकायदा मंडळी जमवुन, तुषार हंबीर उपचार घेत असलेल्या वार्ड मध्ये जावुन तलवारी, कोयते व गावठी पिस्टल घेऊन, तुषार हंबीर यांस जीवे ठार मारण्याचे उध्देशाने कोयत्याने वार करुन पिस्टल मधुन दोन वेळा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपींच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वाघमारे टोळीने पुण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी, खंडणीसाठी पळवून नेणे, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोडी चोरी, विनयभंग करणे, पळवून नेणे, विक्रीसाठी अंमली पदार्थ जवळ बाळगणे असे मालमत्तेविरुध्द व शरिराविरुध्दचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे कट कारस्थान रचुन गुन्हे करुन त्यांचे वर्चस्व निर्माण केले आहे. त्याच्या टोळीच्या अशा कृत्यामुळे सदर परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली आहे. त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखिल त्यांनी पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर कायद्याचा वचक बसावा. यासाठी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या वतीने वाघमारे टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता.
दरम्यान, वाघमारे टोळीवर मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर आणि परीमंडळ -२ चे पोलीस उप आयुक्त सागर पाटील यांनी अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी मान्यता दिली आहे. आणि सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. आर. एन. राजे सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे शहर करीत आहेत.
सदरची कामगिरी बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी सातपुते, पोलीस उप-निरीक्षक, राहुल नळकांडे, पोलीस अंमलदार नितीन जगताप, किरण तळेकर आणि सतिष मुंढे यांनी केली आहे.