पुणे : फुरसुंगी ते उरळी देवाची दरम्यानच्या पाणी पुरवठा योजनेचे सुमारे ३ टन वजनाच्या लोखंडी पाईपाची चोरी करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ६ च्या पोलिसांनी हांडेवाडी (हडपसर) परिसरातून बेड्या ठोकल्या आहे.
विकास जालिंदर सकट (वय ३८, सध्या रा. लोहियानगर, गंजपेठ, मूळ रा. अलिपूर, बार्शी, जि. सोलापूर), परविंद कुशेबा कांबळे (वय ३८, रा. वडकी, सासवड रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तुकडे केलेले लोखंडी पाइप, क्रेन, ट्रक असा तब्बल ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड रस्त्यावरील फुरसुंगी ते उरळी देवाची दरम्यान ११ किलामीटरची जलवाहिनी टाकण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे. आरोपी सकट याने साथीदारांच्या मदतीने पाइप चोरले होते. त्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला होता. ट्रकमध्ये पाइप ठेवून सकट पसार झाला होता. त्यानंतर पाइपचे तुकडे करुन त्याने भंगार माल खरेदी विक्री करणारा आरोपी परविंद कुंबळे याला विकले होते. या प्रकरणाचा गुन्हे शाखेच्या युनिट सहाकडून तपास करण्यात येत होता.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांना आरोपी सकट हा हडपसर भागातील हांडेवाडी परिसरात येणार आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने हांडेवाडी परिसरात सापळा रचून आरोपी सकट याला ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपी सकट याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने पाइपचे तुकडे करुन कुंबळे याला विकल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी कांबळेला अटक केली. त्यांच्याकडून क्रेन, पाइपचे तुकडे, ट्रक असा ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक सुरेश जायभाय, भैरवनाथ शेळके, मच्छिंद्र वाळके, कानिफनाथ कारखेले, प्रतीक लाहिगुडे आणि रमेश मेमाणे यांच्या पथकाने केली आहे.