लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर सोलापूरच्या दिशेने निघालेली सहा वाहने एकमेकांना धडकल्याची घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. बुधवारी (ता. ३०) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तीन ते चार वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच एकजण जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील नायगाव चौक परिसरात रिक्षा हा प्रवाशांना घेऊन उरुळी कांचनच्या बाजूने निघाला होता. प्रवाशांना घेऊन निघालेली रिक्षा ही अचानक महामार्गावर आल्याने पाठीमागून आलेल्या क्रेटा कारच्या चालकाने अचानक ब्रेक दाबला.
यामध्ये क्रेटाच्या पाठीमागे असलेल्या टेम्पोची गाडीला जोरदार ठोकर बसली. याचदरम्यान टेम्पोच्या पाठीमागे असलेल्या टँकर, इको कार, पिकअप व एक गॅस कंटेनर या वाहनांच्या एकमेकांना जोरदार धडकल्या. यावेळी टेम्पोत असलेल्या एका शेतकऱ्याच्या तोंडाला दुखापत झाली असून, त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेने रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस दाखल झाले आहेत.
वाहचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन..
कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत गोडाऊनची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या वाहनचालकांकडून महामार्गाच्या विरुद्ध दिशेने जात वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे.
महामार्गावरच वाहनं केली जातात पार्क..
तसेच या परिसरातील अनेक मंगल कार्यालयांना पार्किंग व्यवस्था नसल्याने अनेक वाहने महामार्गावरच पार्किंग केली जातात. पुणे, सोलापूर, हैदराबाद व मुंबई अशा लांब पल्ल्याच्या गाड्यांचे चालकदेखील बेफिकिरीने आपली वाहने महामार्गावर उभी करतात. अशा सर्व वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.