सातारा : महाबळेश्वर जवळ असलेल्या तापोळा रस्त्यावरील मुगदेव घाटात ३० कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. हा टेम्पो दरीत कोसळला असून त्यामधील सर्व मजूर जखमी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही मजूर हे एका टेम्पोमधून कामानिमित्त महाबळेश्वरकडे निघाले होते. सदर टेम्पो हा महाबळेश्वर जवळ असलेल्या तापोळा रस्त्यावर असलेल्या मुगदेव घाटात आला असता चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले व टेम्पो थेट दरीत कोसळला. या टँम्पोत जवळपास ३० मजुर होते.
सर्व मजूर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवले असून प्रशासकीय यंत्रणा सर्वतोपरी मदत करत आहे. जखमींमध्ये आठ महिन्यांच्या गरोदर महिलेसह लहान मुलांचा समावेश आहे.
दरम्यान हा अपघात कसा घडला याबाबत माहिती मिळालेली नाही. तसेच हे कामगार कामाच्या शोधात निघाले होते की, कंत्राटदार त्यांना घेऊन जात होते, हेही स्पष्ट झालं नाही.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी बचावकार्यासाठी धाव घेतली. मात्र या अपघातामुळे मजुरांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.