लोणी काळभोर : खुलेआम अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका तस्कराला लोणी काळभोर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान अटक केली आहे. त्याच्याकडून १९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिसांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात असलेल्या इराणी वस्तीत सोमवारी (ता.12) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास केली आहे.
मुस्लिम नासिर बेग (वय 37, रा. पठारे बस्ती, इराणी गल्ली, कदमवाकवस्ती, ता.हवेली, जि.पुणे) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुरज किरण कुंभार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी स्टेशन (ता. हवेली) परिसरातील इराणी गल्लीत भांडणे, हाणामारी व वादविवाद होत आहेत. या परिसरात गुन्हेगारांचे वास्तव्य असून या ठिकाणी अनेक महिला व पुरुष अवैध व्यवसाय करीत आहेत. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सोमवारी त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबविले.
या ऑपरेशन दरम्यान, गुन्हेगारांचा शोध घेत असताना, मुस्लिम बेग खुलेआम गांजाची विक्री करताना आढळून आला. त्याच्या जवळील पिशवीमध्ये 3 हजार 800 रुपयांचा १९० ग्रॅम गांजा आढळून आला. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपी मुस्लिम बेगवर अंमली पदार्थ आणि मानसोपचार विषयक पदार्थ कायदा, १९८५ अॅक्ट कलम 8 (क), 20(ब) (ii)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, रत्नदीप बिराजदार, दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार रामहरी वणवे, पोलीस अंमलदार सुरज कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
गांजा तस्करीतील मोठा मासा अद्यापही फरारच
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरातील खुलेआम गांजाची विक्री करणारा एक मोठा मासा अद्यापही फरार आहे. या तस्कराने लोणी स्टेशन परिसरातील विद्यार्थ्यांना गांजा विक्री करून अंमली पदार्थाच्या व्यसनाधीन बनविले आहे. या तस्करावर मागील दोन महिन्यापूर्वी एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीही हा तस्कर लोणी काळभोर परिसरात खुलेआम मुक्तसंचार आहे. मात्र लोणी काळभोर पोलीस हे या गांजा तस्कराला अद्यापही पकडत का नाहीत. पोलिसांनी या तस्कारला अभय तर दिले नाही ना. अशी उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.