बीड : फेसबूकवर जाहिरात पाहून ऑनलाईन बैल खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याला सायबर चोरट्याने ९५ हजारांचा गंडा घातल्याची घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. याप्रकणी बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर फरताडे असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर फरताडे हे बीडच्या धारूर तालुक्यातील कारी येथील रहिवाशी आहेत. ज्ञानेश्वर फरताडे यांनी गुरुवारी (ता. १९ ) फेसबूकवर बैलजोडी विकण्याची जाहिरात पाहिली. ज्ञानेश्वर यांना बैलजोडी विकत घ्यायची असल्यामुळे त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला.
त्यावेळी समोरच्या व्यक्तीने ज्ञानेश्वर यांच्याशी गोड बोलत त्याचा विश्वास संपादन केला तसेच बैलजोडी शासकीय वाहनाने पाठवावी लागेल, यासाठी तुम्हाला वेगवेगळे शुल्क भरावे लागतील, असेही सांगितले. अशाप्रकारे ज्ञानेश्वर यांनी समोरच्या व्यक्तीला ९५ हजार १४४ रुपये पाठवले.
मात्र, पैसे दिल्यानतंरही बैलजोडी आली नसल्याने ज्ञानेश्वर यांनी समोरच्या व्यक्तीला फोन केला. पण समोरून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याची ज्ञानेश्वर यांच्या लक्षात आले. ज्ञानेश्वर फरताडे यांनी बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.