हडपसर : परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्या भावाने बहिण शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी असल्याचे सांगून ४५ जणांची तब्बल ५ ते ६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर) व परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलेजा रामचंद्र दराडे (रा. रेव्हेरायीन ग्रीन्स, पाषाण) असे गुन्हा दाखल झालेल्या बहिण भावाचे नावे आहेत. हा प्रकार १५ जून २०१९ पासून सुरु होता. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील एका ५० वर्षाच्या शिक्षकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आपल्या भावाने आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन ही फसवणूक केल्याचा शैलजा दराडे यांनी दावा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलजा उत्तम खाडे (पूर्वाश्रमीच्या शैलजा रामचंद्र दराडे) आणि दादासाहेब दराडे हे भाऊ बहीण आहेत. दादासाहेब दराडे याने शैलजा दराडे या शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांच्या २ वहिनींना शिक्षक या पदावर नोकरी लावतो, असे सांगून प्रत्येकी १२ लाख व १५ लाख रुपये असे २७ लाख रुपये फिर्यादी यांच्याकडून घेतले. त्यांना आजपर्यंत शिक्षक पदावर नोकरी लावली नाही. तसेच त्यांनी वारंवार मागणी करुन त्यांचे पैसे परत केले नाही. अशाच प्रकारे इतर ४४ जणांचा विश्वास संपादन करुन त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.
दरम्यान, याबाबत शैलजा दराडे यांना आपल्या भावाचा हा उद्योग समजल्यावर त्यांनी वर्षभराने आपला भावाशी काहीही संबंध नाही. दादासाहेब दराडे हा सखा भाऊ असल्याचा गैरफायदा घेऊन लोकांना कामे करुन देण्याबाबत सांगत आहेत. शैलजा खाडे यांनी त्याच्याशी संबंध तोडलले आहे. त्यामुळे दादासाहेब दराडे भाऊ असल्याच्या नात्याने कोणीही त्याच्याबरोबर कसलाही व्यवहार करु नये, अशी जाहीर नोटीस ऑगस्ट २०२० मध्ये दिली होती. फिर्यादी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले अधिक तपास करीत आहेत.