पुणे : वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती विजेचा पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोंढवा येथील चार आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या रास्तापेठ विभाग अंतर्गत कोंढवा शाखा कार्यालयाचे शंकर रामकिसन रोंढे हे सहकारी सिद्धार्थ चव्हाण यांच्यासमेवत सोमवारी (दि. 5) कोंढवा येथील भाग्योदयनगर परिसरात दुपारी वीजबिलांची थकबाकी असणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे सरकारी कर्तव्य बजावत होते.
यामध्ये हजरा कॉम्प्लेक्समधील चार घरगुती थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला व मीटर काढून दोघेही कर्मचारी कार्यालयाकडे निघाले होते.
मात्र कोंढवा येथील अफजल कादर कपाडिया, असिफ कादर कपाडिया, मोहमद अफजल कपाडिया व एक अनोळखी इसम यांनी शंकर रोंढे व सिद्धार्थ चव्हाण यांना अडवून वीजमीटर हिसकावून घेतले व दोघांनाही मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली.
महावितरणच्या दोन्ही कर्मचाऱ्यांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले व त्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरुन चारही आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील पोलीस तपास सुरु आहे.