पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या व्यक्तींना योग्य पद्धतीने धडा शिकवेल त्या पहिल्या व्यक्तीला मोफत गुवाहाटी ट्रीप आणि आणि कामाख्या देवीचे दर्शन घडवून आणण्याची ऑफर देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने थेट बॅनरचं झळकवण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशा मजकुराचे फ्लेक्स पुण्यात लावण्यात आले आहेत. पुणे शहरातील अनेक भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आले आहेत.
औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलतांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायाला मिळत आहे. तर शिवप्रेमी रस्त्यावर उतरून आंदोलन करतांना दिसत आहे. दरम्यान आता याच मुद्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अशा पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात लागलेल्या या फ्लेक्सच सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभारण्यात आलेल्या फ्लेक्सवर असा मजकूर लिहला आहे. ज्याला पाहून लोकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या फ्लेक्सवर लिहलंय, जी कोणी पहिली व्यक्ती भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या व्यक्तींना योग्य त्या पद्धतीने धडा शिकवेल, त्या पहिल्या व्यक्तीस मोफत गुवाहाटी ट्रिप व कामाख्या देवी दर्शन मिळेल. त्याचबरोबर खाली टीपही देण्यात आली आहे.
टीप – सदरची घोषणा कुठल्याही पद्धतीने बेकायदेशीर कृत्याला प्रोत्साहन देण्याकरता नसून केवळ छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याकरता आहे.