हडपसर : मांजरी (ता. हवेली) येथील एका २८ वर्षीय व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याला विरार (मुंबई) या ठिकाणी सुखरूप सोडल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. अपहरण अन् नंतर सुखरूप सुटका झाली असली तरी या अपहरणनाट्याचा उलगडा मात्र अद्याप झालेला नसून पोलिसांकडून त्याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरुण व्यापाऱ्याने हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेल्या तरुणाचे मांजरी ग्रामपंचायत हद्दीत दोन दुकाने आहेत. रात्री ११च्या सुमारास दुकान सुरु असताना तिघे जण खरेदीच्या निमिताने दुकान आले. काही वेळाने एक चारचाकी गाडी दुकानासमोर येऊन थांबली. त्या तिघांनी व्यापाऱ्याला उचलून गाडीत बसवले व अपहरण केले. व्यापाऱ्याने गाडीतून आरडाओरडा केल्याने नागरिकांचे लक्ष गेले आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज तपासायला सुरुवात केली. व्यापाऱ्यांचा मोबाईल आणि इतर गोष्टी देखील तेथेच असल्याने अपहरणाचे कारण पोलिसांना कळेना. पोलीसानाच्या चौकशीला व्यापाऱ्याचे नातेवाईकांकडे देखील माहिती नसल्याने पोलिसांनी व्यापाऱ्याचे कुणाशी भांडण किंवा वादविवाद झाले आहेत याची पडताळणी करण्यास सुरुवात केली.
पोलिसांचा शोध सुरु असताना मध्यरात्री एकच्या सुमारास व्यपाराचाच फोन आला, मला सुखरूप विरार (मुंबई) येथे सोडण्यात आले आहे. हा व्यापारी पहाटे ५च्या सुमारास ट्रॅव्हेल्सने पुण्यात पोचला. पोलीस व्यपाऱ्याकडून घटनेचे माहिती घेत असून अपहरण का झाले हे अद्याप समोर आले नाही. चार महिन्यांपुर्वी व्यपाऱ्याचा घटस्फोट झाला होता, त्यानंतर तो पुण्यात आला होता. त्या अनुशंघाने देखील पोलीस तपास करत आहेत.