पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची २९ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
विशालभाई गोविंदभाई रावल (वय-२६), मयूरभाई चौधरी, गोपालभाई रावल (तिघे हि रा. गुजरात) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोलापूर येथील व्यक्तीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुळचे सोलापूर येथील रहिवासी आहेत. त्यांची एका मित्राकडून आरोपी विशालभाई रावल, मयूरभाई चौधरी, गोपालभाई रावल यांच्याशी ओळख झाली होती. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी तक्रारदाराला दाखविले होते.
आरोपी तक्रारदाराला कोथरुड भागात भेटले होते. त्यांच्याकडून वेळोवेळी २९ लाख ५० हजार रुपये घेतले. आरोपींना पैसे दिल्यानंतर तक्रारदाराला त्यांनी परतावा दिला नाही. दिलेल्या पैशांबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक सावळे तपास करीत आहेत.