छत्रपती संभाजीनगर : आज देशात स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा होताना बघायला मिळत आहे. परंतु राज्यात मात्र दोन शेतकरी तरूणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोन्ही घटना छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापुरमध्ये घडल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्याचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
नेमकं घडलं काय?
स्वातंत्र्यदिनी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर सोयगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने न्याय मिळाला नाही, म्हणून अंगावर डिझेल ओतून घेत त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला आहे. सोयगाव तालुक्यातील घोरपड येथील शिवारामध्ये महावितरणाच्या चुकीमुळे शॉर्टसर्किट झाले होते. त्यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं.
महावितरणच्या चुकीमुळे शेतकऱ्याच नुकसान…
महावितरण कार्यालयाच्या चुकीमुळे शेतकऱ्याच नुकसान झालं होतं. त्यामुळे त्याने महावितरणाकडे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र एमएसईबीने हात वर करत जबाबदारी झटकून लावली. त्यामुळे व्यथित झालेल्या आदित्य श्रावण गायकवाड या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालय येथे न्याय मिळावा, अशी मागणी केलेली होती. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणताच प्रतिसाद दिला गेला नाही. त्यामुळे सदर शेतकऱ्याने स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून शेतकऱ्यांला ताब्यात घेतल्याने मोठी जीवितहानी टळली.
कोल्हापूरमध्ये तरूणाकडून आत्मदहनाचा प्रयत्न..
स्वातंत्र्यदिनी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये तरूणाकडून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात पाणीपुरवठा संस्थेसाठी उभारण्यात आलेल्या सोलार पॅनलची चौकशी करण्याची मागणी या तरूणाने केली होती. यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप या तरूणाने केला. कृष्णात भीमराव पाटील असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अंगावर रॉकेल ओतून घेत त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. परंतु, पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला