Mumbai News : मुंबई : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीत नागरिकांना आनंदाचा शिधा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यंदा आनंदाचा शिधा देताना त्यामध्ये पोहे आणि मैद्याचा देखील समावेश असणार आहे. यामुळे सामान्यांची दिवाळी अधिक गोड होणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
सामान्यांची दिवाळी अधिक गोड होणार
राज्यातल्या १ कोटी ६२ लाख ४२ हजार शिधापत्रिकाधारकांसाठी शिंदे फडणवीस सरकारने घेतला होता. या सगळ्यांना दिवाळीसाठी रवा, चणाडाळ, साखर आणि तेल १०० रूपयात दिले जाणार आहे. या निर्णयामुळे मागील वर्षी सरकारी तिजोरीवर ५०० कोटींचा आर्थिक भार पडला होता. आता नुकत्याच झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा हा शिधा वाटला जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे. (Mumbai News) गेल्या वर्षी दिवाळीच्या आधी ही योजना जाहीर करण्यात आली होती. यावर्षी गणेश उत्सवाच्या आधीच ही योजना जाहीर करण्यात आली आहे.
गेल्यावर्षी राज्यातील केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना हा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. यंदा देखील याच रेशनधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. (Mumbai News) मात्र, गुडीपाडव्यापर्यंत आनंदाचा शिधा जनतेपर्यंत वेळवर पोहचला नव्हता. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे यंदा तरी हा शिधा सामान्यांच्या घरी वेळेवर पोहचणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या वेळी झालेल्या बैठकीत राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझेक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते. (Mumbai News) याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी अजित पवार यांची तब्येत ठिक नसल्याचे सांगण्यात आले.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय
* दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिक्षा. मैदा आणि पोह्यांचा देखील समावेश.
* विदर्भ, मराठवाड्यातील कृषीपंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्चदाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ.
* अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.
* नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार. ४५ पदांनाही मंजुरी.
* इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार, विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा.
* गारगोटी येथील तंत्रनिकेतनच्या विना अनुदानित शाखांना ९० टक्के शासन अनुदान.