-गोरख कामठे
हडपसर, (पुणे) : वडकी, फुरसुंगी परिसरातील कानिफनाथ डोंगराच्या परिसरामध्ये व्यायाम करण्यासाठी, मॉर्निंग वॉक तसेच सायकलिंग करणाऱ्या नागरिकांना तरस प्राण्याचे दर्शन होत आहे. गुरुवारी (ता. 01) दुपारी वडकी, कानिफनाथ परिसरामध्ये तरस फिरताना येथील उरुळी देवाची आणि जाणीव निसर्गप्रेमी फाउंडेशनच्या काही सदस्यांना फिरताना दिसला. गेल्या अनेक दिवसांपासून हा तरस प्राणी हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, फुरसुंगी, वडकी परिसरात दिसून येत आहे.
यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून निसर्गप्रेमी फाउंडेशनच्या काही सदस्यांनी काढलेला तरस या प्राण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हडपसर व देवाची उरुळी परिसरातील जाणीव निसर्गप्रेमी फाउंडेशनच्या सदस्यांना हा तरस दिसला.
अनेक दिवसांपासून या परिसरात तरस, बिबट्याचा वावर वाढला आहे. गुरुवार व रविवार ट्रेकिंगसाठी अनेक नागरिक जात असतात. त्यामुळे या ठिकाणी ट्रेकिंगसाठी जाताना नागरिकांनी सावधानगी बाळगावी, असे आवाहन फाउंडेशनच्या सदस्यांनी केले आहे.
दरम्यान, तरस हा आता नागरिकांना दिवसाढवळ्या दिसू लागल्याने परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांनी सुरक्षितता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.