पुणे : बिल्डरने फ्लॅट खरेदी-विक्री व्यवहारामध्ये केलेल्या फसवणुकीबाबत त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून पुढील योग्य ती मदत करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागून, तडजोडीअंती त्यातील १ लाख ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दिघी पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई आळंदी वडमुखवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील आंबा चौकाजवळ बुधवारी (ता.३१) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास केली आहे.
अमोल दशरथ जाधव (वय ४३, पद पोलीस हवालदार, ब.नं. ७१७, नेमणुक – दिघी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड, पोलीस आयुक्तालय, पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीसाचे नाव आहे. याप्रकरणी एका ४२ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी चोवीसवाडी (चऱ्होली) येथे बिल्डरकडून फ्लॅट खरेदी केला होता. तो फ्लॅट बिल्डरने तक्रारदार यांच्या परवानगीशिवाय परस्पर दुसऱ्या व्यक्तीस विक्री केला आहे. म्हणून तक्रारदार यांनी बिल्डरविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. सदर तक्रार अर्जावरून बिल्डरवर फौजदारी गुन्हा दाखल करून योग्य ती मदत करण्यासाठी लोकसेवक पोलीस हवालदार अमोल जाधव याने तक्रारदार यांच्याकडे २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, लोकसेवक पोलीस हवालदार अमोल जाधव यांनी वरील काम करुन देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती १ लाख ७० हजार रुपये देण्याचे ठरले होते.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तेव्हा तक्रारदार यांच्याकडून १ लाख ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार अमोल जाधव यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.