केडगाव (पुणे) : दौंड विधानसभेसाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी आपली रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. त्यातच आता दौंड तालुक्यातील पारगाव (सालू,- मालु) येथील केशवराव जेधे यांचे पणतू दिग्विजय जेधे हे पुढे सरसावले आहेत
दिग्विजय जेधे हे (दि. 1 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट) या तेरा दिवसांच्या काळात दौंड तालुक्यातील 80 महसूल गावे तर 24 वाड्या -वस्त्या अशा 100 हून अधिक गावात 300 किमी. प्रवास करणार असल्याचे पूणे प्राईम न्युज शी बोलताना सांगितले. याअगोदर 1957 ला देशभक्त केशवराव जेधे यांनी बारामती लोकसभा मतदार संघात अशीच एक पद्ययात्रा काढली होती. त्याच पार्श्वभमीवर या पदयात्रेत दिग्विजय जेधे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचणार आहेत. त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेणार आहेत.
दिग्विजय जेधे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे पदाधिकारी आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील विविध प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्याशी चर्चा करण्यासाठी जनसंवाद पदयात्रेचे नियोजन केले आहे व याचा अहवाल ते शरद पवार यांच्या समोर मांडून त्या सर्व समस्या सोडविणार असल्याचे सांगितले.
मी विधानसभेसाठी इच्छुक असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारी दिल्यास ते लढवणार असल्याची कबुली ही दिग्विजय जेधे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली. परंतु उमेदवारी मिळाली नाही तर मी पक्ष सोडणार नाही असेही मत दिग्विजय जेधे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक आणि सामाजिक वारसा लाभलेल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी, सामाजिक विचारांची माहिती पोहोचवण्यासाठी, आयुष्यभर त्याग करणारे केशवराव जेधे व त्यांच्या कुटुंबीयांचा 350 वर्षाचा सामाजिक आणि वैचारिक वारसा पुढे चालवण्यासाठी दिग्विजय जेधे हे पुढे सरसावले आहेत.