बुलढाणा : राज्यात सद्या लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. कधी राजकारण्यांच्या आरोप प्रत्यारोपामुळे तर कधी सरकारच्या विविध बदलांमुळे, परंतु आता एका वेगळ्या कारणामुळे लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी मराठीतून अर्ज केल्यास तो रद्द करण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्याचे तहसीलदारांचे एक पत्र सद्या व्हायरल होत आहे.
बुलढाण्यातील मोताळा तालुक्यातील तहसीलदारांनी तालुका प्रशासनाला हे आदेश दिले आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी जर मराठीतून अर्ज आल्यास तो तात्काळ रद्द करा, असे स्पष्ट आदेश त्यामध्ये देण्यात आले आहेत. बुलढाणा प्रशासनाच्या या आदेशामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
काय म्हटलंय आदेशात?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांनी रोज 500 अर्जाची पडताळणी करायची आहे. सदर काम करताना संजय गांधी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला लाभार्थ्याचे अर्ज तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आले तर ते रद्द करण्यात यावेत. तसेच सदर अर्ज मराठीमध्ये असल्यास ते रद्द करण्यात यावेत.
आलेल्या लाखो अर्जाचे काय होणार?
तहसीलदारांच्या या आदेशामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठीत अर्ज असेल तर तो बाद करावा या आदेशाला आता चांगलाच विरोध होताना दिसत आहे. या आधी लाखो माता-बहिणींनी या योजनेसाठी मराठीतून अर्ज केला आहे. त्यामुळे आपला अर्ज बाद होतो की काय अशी भीती त्यांना सतावू लागली आहे. त्याचसोबत आपल्याच राज्यात मराठीचा अपमान केला जात असल्याची भावनाही नागरिकांतून व्यक्त होत आहे.