अमरावती : अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीमध्ये दिवसाढवळ्या एका अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. शहरातील राजापेठ अंडरपासजवळ सकाळी 8.30 च्या सुमारसा ही घटना घडली असून एकतर्फी प्रेमातून हा चाकू हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी प्रफुल काळकर (वय 23 वर्ष) याला पोलीसांनी अटक केली आहे. या घटनेनं मात्र संपूर्ण परिसर हादरला आहे.
दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला..
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील राजपेठ अंडरपासमार्गे एक अल्पवयीन मुलगी कॉलेजला पैदल जात होती. दरम्यान, या मुलीच्या परिसरातच राहणाऱ्या एका युवकाने तिची वाट अडवून तिच्या सोबत वाद घालायला सुरवात केली. त्यानंतर त्याने सोबत आणलेल्या धारधार शस्त्राने तरुणीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला जखमी केलं. मुख्य रस्त्यावर दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या नंतर परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमी युवतीकडे धाव घेतली. दरम्यान मारेकरी पळ काढण्याच्या तयारीत असताना त्याचा पाठलाग करून जवळील ऑटो चालकांनी त्याला पकडून जबर मारहाण केली. या संपूर्ण घटनेची माहिती राजपेठ पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी या मारेकऱ्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
एकतर्फी प्रेमातून हल्ला?
तर जखमी अल्पवयीन मुलीवर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, याआधी देखील याच मुलाने अल्पवयीन मुलीला अडीच महिन्यांपूर्वी छेडले होते. त्यावेळी राजापेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणातील संशयित आरोपी प्रफुल काळकर विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर पुन्हा ही घटना घडली आहे त्यामुळे एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.