लहू चव्हाण
पाचगणी : भोसे (ता. महाबळेश्वर) येथील मीठा इस्टेट मधील बंगला नंबर पाचमध्ये सुरू असणाऱ्या बोरवेलच्या कामावर भोसे ग्रामस्थांनी आक्षेप घेत बोरिंगचे काम बंद पाडले असून ग्रामस्थांनी बोरवेल गाडी व संबंधित बंगला मालकाला बोर मारण्यासाठी अटकाव केला.
या मुंबईच्या बंगला मालकाने जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आम्ही हे काम करत असलयाचा खुलासा केला आहे.उच्च संबंध असलेल्या, धनिकांना जिल्हा प्रशासन बोअर मारण्याची परवानगी देते, मात्र शेतकरी वर्गाला याची परवानगी देत नसल्याने सदर बोरिंग मारण्याच्या प्रकारावर स्थानिक ग्रामस्थानी प्रशासनाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला.
या भागातील पाच नंबरच्या बंगल्याच्या मालकाने कोणत्या कोणत्या आधारावर परवानगी मिळविली, याबाबत येथील ग्रामस्थ आर्श्चर्य व्यक्त करत असून याबाबत विहिरीसाठीचा परवाना रद्द कारण्यासाठे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, आमदार मकरंद पाटील, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांना निवेदन दिले आहे.
आमच्या ग्रामपंचायतीचे हद्दीतील मिठा इस्टेट कॉलनी मध्ये आज दि. ११/११/२०२२ बोअरवेल चे खोदकाम चालू असलेचे आमचे निदर्शनास आले असून मौजे भोसे हे गाव अतिउपसा सिंचन विभागात येत असल्याने या ठिकाणी बोअरवेलला परवानगी देता येत नाही.
असे असताना श्रीमती स्नेहल सिद्धार्थं ताडगे. रा. स.न. ३६+४२ब भूखंड क्र. ५. रा. भोसे ता. महाबळेश्वर यांना दि. २१/१०/२०२२ रोजीच्या पत्राने आपल्या कार्यालयाकडून विंधन विहीर (बोअरवेल) साठी परवानगी देण्यात आल्याचे दिसून येते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वास्तविक या प्रकरणासोबत जोडलेला ग्रामपंचायत ना हरकत दाखला हा ग्रामपंचायत सदस्यांच्या मिटिंग मध्ये ठराव झालेला नसताना व त्यांच्या अपरोक्ष ग्रामसेवक यांनी आपल्या अधिकारात परस्पर दिलेला आहे.
त्यामुळे सदर बोअरवेल साठी दिलेल्या परवानगीस तत्काळ स्थगिती देऊन या व यासारख्या मौजे भोसे ग्रामपंचायत हद्दीतील आपल्या कार्यालयाकडून दिलेल्या इतर बोअरवेल साठीच्या परवानग्या रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.