संतोष पवार
पळसदेव (पुणे): शालेय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध शैक्षणिक योजना राबवून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळणे, आवश्यक असून त्यासाठी पोषण आहारात कडधान्ये , पौष्टिक तृणधान्ये यांचा समावेश करावा . शालेय पोषण आहाराकडे विशेष लक्ष देऊन त्याकरिता शाळांना वारंवार भेटी देऊन पोषण आहाराची पाहणी करावी, असे आदेश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, शिवाजीनगर (पुणे) येथे शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत शिक्षणमंत्री केसरकर बोलत होते. शिक्षकांचे स्काऊट गाईड प्रशिक्षण, मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा टप्पा २, स्वच्छता मॉनिटर टप्पा २ , शिक्षण सप्ताह , महावाचन उत्सव, परसबाग योजना, शिष्यवृती परीक्षा, पोषण आहार कीचन शेड व्यवस्था, इंटरनेट सुविधा आदि विषयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा बोजा वाढणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले . आढावा बैठकीच्या वेळी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक शोभा खंदारे, नंदकुमार बेडसे, महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, शिक्षण संचालक महेश पालकर यांच्यासह दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक आणि इतर अधिकारीही उपस्थित होते.